जळगांव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

रावेर : सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे पर्यवेक्षक श्री. वाय. जी. कट्यारमल सर यांच्या अध्यक्षतेखाली संस्कृत दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्कृत भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा तसेच भारतीय संस्कृतीतील योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री. बी. आर. जोशी सर यांनी संस्कृत दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना संस्कृत ही भारतीय ज्ञानपरंपरेची समृद्ध भाषा असून, भारतीय संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म क्षेत्रात तिचे अनन्यसाधारण योगदान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करून तिच्या समृद्ध वारशाचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. वाय. जी. कट्यारमल सर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेशी जोडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन केले. संस्कृत साहित्य व संस्कृतीचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा असून, संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. एन. व्ही. चौधरी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समिती प्रमुख सौ. एन. व्ही. चौधरी मॅडम व श्री. वाय. पी. महाजन सर यांनी नियोजन केले.

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कृत दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीविषयी अभिमान आणि आस्था निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!