जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.
जळगाव : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजिद खान साबीर खान (वय २९, रा. नागदरोड, चाळीसगाव) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्ती यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस नोंदीनुसार, वाजिद खान याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकूण ८ गुन्हे दाखल असून त्यात चोरीचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत, दुखापत तसेच गैरकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण करण्यासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेत MPDA अंतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याचे जळगाव पोलिसांच्या पत्रात नमूद आहे.
सण-उत्सवांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यात येत आहे. आगामी काळातही सराईत व समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळत आहे.
जळगाव जिल्हा पोलिसांच्या या कारवाईमुळे आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.
