रक्षाबंधनानिमित्त भाऊ देणार बहिणींना दर महिन्याला १० बिया; वृक्षसंवर्धनाचा अभिनव संकल्प

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी

मेहरुण : रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने ‘लाडकी बहीण योजना’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत भाऊ आपल्या बहिणीला दर महिन्याला १० बिया भेट देणार असून, या बियांचे रोपांमध्ये रूपांतर करून त्यांचे संगोपन करत मोठे वृक्ष तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला केवळ राखी किंवा भेटवस्तू न देता भविष्यातील हिरवाईची भेट देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

बहिणींनी या बियांची लागवड करून त्यांची नियमित काळजी घ्यावी, तसेच प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या दहा बियांचे संवर्धन करून त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर करावे, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

परिसरात नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाने पुन्हा एकदा शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, वृक्षसंवर्धनाची सवय आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा विद्यालयाचा हा प्रयत्न आहे.

“राखीचे नाते जपूया, बियांचे झाड करूया आणि भावाच्या प्रेमाची आठवण हिरवाईतून जपूया,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!