जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरात कर्कश आवाज करणाऱ्या तसेच मॉडिफाइड सायलेन्सरचा वापर करून नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या बुलेट मोटरसायकलस्वारांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या २६ बुलेट मोटरसायकलींचे मॉडिफाइड सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आलेले हे सायलेन्सर रोडरोलरखाली फिरवून नष्ट करण्यात आले.

नागरिकांना पोलिसांचे विशेष आवाहन

कर्कश आवाज करणारे अथवा कंपनीच्या मूळ स्वरूपात बदल करून बसविण्यात आलेले मॉडिफाइड सायलेन्सर वापरू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा वाहनांमुळे ध्वनिप्रदूषण होऊन ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कंपनीने निर्धारित केलेले मूळ सायलेन्सरच वापरावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

जळगाव पोलिसांकडून अशा वाहनांची तपासणी व कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, कर्कश आवाज करणारे किंवा मॉडिफाइड सायलेन्सर बसवून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

“कर्कश आवाज नको – शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध जळगाव हवे! वाहतूक नियम पाळा – ध्वनिप्रदूषण टाळा – नागरिकांचा त्रास टाळा!” असा संदेश जळगाव पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!