जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरुण : विद्यार्थ्यांमध्ये अन्नसुरक्षा, स्वच्छता, पोषण आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे सुरक्षा व आरोग्य समितीच्या वतीने अन्नसुरक्षा व अन्नप्रदूषण जनजागृती उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमासाठी सुरक्षा व आरोग्य समितीच्या सदस्या म्हणून श्रीमती सरला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सुरक्षित अन्नाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. अन्न तयार करण्यापूर्वी व खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, स्वच्छ व सुरक्षित पाण्याचा वापर करणे, अन्न झाकून ठेवणे, ताजे व पौष्टिक अन्न सेवन करणे तसेच अन्नाची योग्य साठवणूक करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
उपक्रमांतर्गत ‘अन्न सुरक्षा व अन्न प्रदूषण’ या विषयावर आकर्षक माहितीफलक व जनजागृती पोस्टर तयार करण्यात आले. पोस्टरच्या माध्यमातून उघडे, शिळे किंवा दूषित अन्न न खाणे, बुरशी लागलेले पदार्थ टाळणे, भेसळयुक्त अन्नापासून सावध राहणे तसेच पॅकबंद पदार्थांची उत्पादन तारीख व अंतिम मुदत तपासणे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

अस्वच्छ पाणी, अस्वच्छ भांडी, धूळ-माशा आणि अयोग्य साठवणुकीमुळे अन्न दूषित होऊन आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. “सुरक्षित अन्न – निरोगी जीवन” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वच्छ व सुरक्षित अन्नाची निवड करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्नाची स्वच्छता, आरोग्यदायी आहार, अन्नप्रदूषण टाळणे आणि अन्नाची नासाडी रोखणे याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली. “स्वच्छ अन्न – निरोगी जीवन – आनंदी समाज” हा संदेश देत उपक्रमाची सांगता करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुरक्षा व आरोग्य समितीच्या सदस्या श्रीमती सरला पाटील यांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
