विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जामनेर शहर व परिसरात गॅस सिलिंडर चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी गॅस एजन्सीच्या गोदामाला चोरट्यांनी लक्ष्य करत १० सिलिंडर लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी शहराबाहेरील सुशीला गॅस एजन्सीतून १० सिलिंडर चोरीला गेल्यानंतर पुन्हा गारखेडा गावाबाहेरील सिद्धेश गॅस एजन्सीच्या गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सिलिंडर लंपास केले. त्यामुळे परिसरातील गॅस एजन्सींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहने गॅसवर चालविली जात असल्याचे सांगितले जाते. सीएनजी पंपांची अपुरी उपलब्धता तसेच प्रतीक्षा कालावधीमुळे काही वाहनांमध्ये घरगुती गॅसचा अनधिकृत वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सिलिंडरची मागणी वाढत असून, या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सलग दोन दिवसांत २० सिलिंडर चोरीच्या घटना घडल्याने गॅस वितरकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!