विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जळगाव : शहरासह जिल्ह्यात चोरी, दरोडे आणि घरफोडीच्या घटनांनी चिंता वाढली असतानाच नशिराबाद परिसरात दरोडेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावरच धाड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून महिलेच्या गळ्याला सुरा लावत दागिने आणि रोकड देण्याची मागणी केली. मात्र, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत डायल ११२ वर संपर्क साधल्याने मोठा अनर्थ टळला.

नातेवाईकाच्या निधनानंतर कुटुंब आले होते नशिराबादला

नशिराबाद येथील भादळी रोडवरील मुकेश्वरनगर परिसरात पोलीस नाईक गणेश कोळी यांचे घर आहे. ते ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील विष्णूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. नातेवाईकाच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी कोळी कुटुंब नशिराबाद येथे आले होते.

बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात दरोडेखोरांनी अचानक घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाने गणेश कोळी यांच्या पत्नी सुनीता यांच्या गळ्याला सुरा लावून त्यांच्याकडील दागिने काढून देण्याची मागणी केली. दुसऱ्या दरोडेखोराने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड देण्याची धमकी दिली.

पोलिस कर्मचाऱ्याचे प्रसंगावधान

परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच गणेश कोळी यांनी शांतपणे बाथरूममध्ये जाऊन डायल ११२ या पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी मदत पोहोचविण्याची हालचाल सुरू झाली.

दरम्यान, दरोडेखोरांना पोलिस आल्याची चाहूल लागताच त्यांनी घरातून पळ काढला. जाताना त्यांनी घरातील टेबलवर पडलेली गणेश कोळी यांच्या कारची चावी उचलली आणि कार घेऊन भादळी रोडने पसार झाले.

कारचा पाठलाग; अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर फरार

पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी मणियारखेडा शिवारातील अंधारात कार सोडून तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून, दोन्ही संशयित दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.

पोलिस कर्मचाऱ्याने योग्य वेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कुटुंबाचा संभाव्य धोका टळला. या घटनेमुळे नशिराबाद परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!