जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार. विशेष वृत्तांत.

मालेगाव : मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील दहिवाळ शिवारात बुधवारी भीषण अपघात होऊन दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर तब्बल २३ प्रवासी जखमी झाले. पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा एसटी बस आणि चाळीसगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी असल्याने धडकेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ आणि आक्रोश उडाला.

या दुर्घटनेत इरशाद बी रमजान मणियार (६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (६५, रा. एरंडोल) या दोन महिला प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

२३ प्रवासी जखमी; काहींची प्रकृती चिंताजनक

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने मालेगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. जखमींमध्ये प्रणिता विनोद ततार, राजेन्द्र जगन्नाथ ततार, आशा राजेन्द्र ततार, ऋतुजा शुभम सोनजे, अरमान नजीम पिंजारी, गोकुळ रामदास भामरे, सुनंदा गोकुळ भामरे, सुहाना अझीसा, निधा अझीसा आणि रत्नाबाई नाना अहिरे यांच्यासह २३ प्रवाशांचा समावेश आहे.

काही काळ वाहतूक ठप्प

भीषण अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातास नेमके कोण जबाबदार आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

दहिवाळ-कळवाडी फाटा मार्ग ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

मालेगाव-चाळीसगाव मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः दहिवाळ ते कळवाडी फाटा या अवघ्या ९ किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल ११ धोकादायक वळणे असल्याचे सांगितले जाते. वाढती वाहतूक, धोकादायक वळणे आणि वेगवान वाहनांमुळे या मार्गावर अपघातांचा धोका कायम आहे.

या भीषण दुर्घटनेनंतर या मार्गावरील धोकादायक वळणांवर सुरक्षा उपाययोजना, वेग नियंत्रण आणि आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!