जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव पूर्वच्या वतीने चोपडा येथील लक्ष्मीनारायण लॉन्स अँड रेसिडेंसी येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सौ. चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, महिला सक्षमीकरण आणि पक्षाच्या विविध योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष तथा चोपडा भाजप नगरसेवक सौ. संध्याताई महाजन होत्या. यावेळी प्रदेश प्रभारी सौ. सविताताई जैसवाल, प्रदेश सचिव सौ. रेखाताई वर्मा, धुळे महापौर तथा प्रदेश महामंत्री महिला मोर्चा सौ. जयश्री कमलाकर अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, नरेश महाजन, मंडळ अध्यक्ष कांतीलाल पाटील सर, नरेंद्र पाटील, पिंटू भाऊ पावरा तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
बैठकीत जळगाव पूर्व विभागातील महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बूथ स्तरापासून प्रभाग स्तरापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासह आगामी कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले.

यावेळी सौ. चित्राताई वाघ यांनी महिला मोर्चाने अधिक गतिमान आणि प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या महिला-केंद्रित योजनांची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
सौ. जयश्री कमलाकर अहिरराव यांनी संघटनात्मक बळकटीसाठी स्थानिक पातळीवरील सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सौ. रेखाताई वर्मा यांनी महिला मोर्चाच्या कार्याला अधिक गती देण्याचे आवाहन केले. तर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. संध्याताई महाजन यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून महिला शक्तीला संघटित करण्याचे आवाहन केले.

बैठकीस महिला मोर्चाच्या स्थानिक पदाधिकारी, भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला मोर्चाच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
