जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव : आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तन्वीर उर्फ तन्न्या रहीम शेख (वय 21) याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्ती यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तन्वीर शेख याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला, दुखापत, दंगली, घरफोडी, आगळीक आणि आर्म्स ॲक्ट यांसह तब्बल 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांमध्ये 2022 ते 2026 या कालावधीतील विविध गंभीर प्रकरणांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, यापूर्वीही संबंधित इसमाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा न होता पुन्हा गुन्हे करण्याची प्रवृत्ती सुरूच राहिल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.

जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी प्रस्ताव तयार करून तो 11 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी MPDA अंतर्गत आदेश पारित करून संबंधित आरोपीला येरवडा, पुणे येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

या आदेशाची अंमलबजावणी करत जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने संबंधित इसमाला ताब्यात घेऊन 14 ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल केले. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

गणेशोत्सवापूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी उचललेले हे कठोर पाऊल मानले जात असून, आगामी काळातही अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!