पारंपरिक रानभाज्या व आदिवासी संस्कृतीचा घेतला अनुभव

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील.
जळगाव पावसाळी हंगामातील पारंपरिक रानभाज्या, नैसर्गिक अन्नपदार्थ आणि आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देण्यासाठी आयोजित रानभाजी महोत्सवाला आज जिल्हाधिकारी तथा महापौर यांनी भेट देऊन पाहणी केली. हा महोत्सव रोटरी भवन, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी गट व महिला बचत गटांनी आणलेल्या रानभाज्यांचे विविध स्टॉल्स, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादनांची जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी सादर केलेली पारंपरिक वेशभूषा, संस्कृती आणि रानभाज्यांवर आधारित माहितीही त्यांनी जाणून घेतली.

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पारंपरिक अन्नपदार्थांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य आणि स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रानभाजी महोत्सव हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. याद्वारे आदिवासी समुदायाची समृद्ध संस्कृती आणि निसर्गाशी निगडित पारंपरिक ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्नही यशस्वी ठरत आहे.

जिल्हा प्रशासनाने या उपक्रमाचे स्वागत करताना स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.

