जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरुण : पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव–२०२६’ मध्ये श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुणच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभागी होत वृक्षसंवर्धन, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसर, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व जाणून घेतले. पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून ‘निसर्ग वाचवा, भवितव्य घडवा’ असा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचविला.
पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून जागरूकता निर्माण व्हावी, तसेच समाजामध्ये हरित जीवनशैलीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले. ‘माझी शाळा–माझे पर्यावरण, माझी जबाबदारी’ या भावनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आयोजक व विद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले.
नागरिकांना महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन
हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव हा सर्वांसाठी पर्यावरणविषयक माहिती, उपक्रम आणि जनजागृतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, नागरिकांनी व पालकांनी नूतन मराठा विद्यालय येथे आयोजित या पर्यावरण महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
“हिरवांकुर आजचा… हरित भारत उद्याचा!” 🌱
