जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.

अंतुर्ली : अंतुर्ली येथून जळगावकडे जाणारी एसटी बससेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

अंतुर्ली तसेच परिसरातील नरवेल, पातोंडी, बेलखेड, भोकरी, बेलसवाडी आणि कर्की येथील अनेक नागरिक शिक्षण, आरोग्य, शासकीय कामे तसेच इतर दैनंदिन कामांसाठी जळगाव येथे ये-जा करतात. मात्र या भागातून जळगावकडे थेट एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मध्येच बस बदलून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि दिव्यांग बांधवांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी अंतुर्ली येथून सकाळी ६.३० वाजता जळगावकडे बस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही बस बेलखेड फाटा, बेलसवाडी, कर्की, पूर्णाद फाटा, मुक्ताईनगर, वरणगाव, भुसावळ, साकेगाव, नशिराबाद मार्गे जळगाव अशी सुरू करण्याची मागणी आहे.

तसेच जळगाव येथून सायंकाळी ५.३० वाजता अंतुर्लीकडे बस सोडून ती अंतुर्ली येथे मुक्कामी ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांना नियमित, सुरक्षित आणि थेट प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या मागणीसंदर्भात जिल्हा कंट्रोलर, जळगाव, आगार प्रमुख कलाल साहेब, मुक्ताईनगर तसेच ट्रॅफिक अधिकारी मयूर पाटील, जळगाव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनासोबत अंतुर्ली ग्रामपंचायतीचे प्रशासक, धामंदे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, बेलसवाडी व कर्कीच्या सरपंचांसह प्रवाशांच्या सह्यांचे पत्र जोडण्यात आले आहे.

बससेवा तातडीने सुरू करून ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी एस. ए. भोई, अनिल वाडीले, शे. भैय्या शे. करीम, किरण धायले आणि युवराज भिल्ल यांनी केली आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!