‘हॉटेल साई बिअर बार’वर राज्य उत्पादन शुल्कची धाड !
गोव्यातील मद्य अन् बनावट दारू बनवण्याचे साहित्य जप्त; दोघे गजाआड
जालना प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत गोवा राज्यातून आणलेले मद्य व बनावट मद्य तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत २ लाख ७७ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख,सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर आणि अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पथकाने रांजणी येथील ढोबळेवाडी रोडवरील ‘हॉटेल साई बिअर बार’वर छापा टाकला. तेथे गोव्यातील ‘स्मॉल पीटर रिझर्व्ह व्हिस्की’च्या सीलबंद बाटल्या, ‘इम्पीरियल ब्लू’ व ‘रॉयल स्टॅग’च्या बाटल्यांवर लावण्यात येणारे बुचे आणि बनावट दारूसाठा आढळून आला.
याप्रकरणी लक्ष्मण बाबासाहेब शिंगणे (रा. रांजणी) आणि कृष्णा जाधव (रा. आष्टी, जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस. एन. गायकवाड, एन. टी. घोगरे, सहायक दुय्यम निरीक्षक एस. एस. गुंजाळे, वाहनचालक व्ही. डी. पवार, जवान के. एस. धुणावत, वाय. एल. खरात, जी. आर. तायडे, बालाजी डिघे, सोमनाथ जाधव, रामेश्वर उगले आणि महिला जवान दीक्षा जाधव यांनी केली. पुढील तपास निरीक्षक एस. एन. गायकवाड करत आहेत.
ठळक मुद्दे:
धनसावंगीतील रांजणी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला.
गोव्यातील मद्य व बनावट दारूचे साहित्य सापडले. २ लाख ७७ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लक्ष्मण शिंगणे व कृष्णा जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; तपास सुरू.
