जळगाव | प्रतिनिधी : महेश माळी

जळगाव शहराला काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बायपास महामार्ग खराब झाल्यामुळे बाहेरील जड वाहतूक पुन्हा शहरातून वळविण्यात आली असून शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी अधिक तीव्र होत असून नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच व्यापाऱ्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही दिवस सुरळीत झालेली वाहतूक व्यवस्था पुन्हा विस्कळीत झाल्याने जळगावकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यासोबतच नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जिल्ह्याला आमदार, खासदार आणि मंत्री यांचे प्रतिनिधित्व लाभलेले असतानाही नागरिकांना अशा मूलभूत समस्यांना का सामोरे जावे लागत आहे? निकृष्ट दर्जाची कामे, अपुरे नियोजन आणि देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, प्रशासनाने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच बायपास महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून बाहेरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

📢 नागरिकांना आवाहन :

वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सर्व वाहनचालकांनी संयम बाळगावा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अनावश्यक घाई टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!