राहुरी प्रतिनिधी.
राहुरी शहरातील बुवासिद्ध बाबा मंदिर परिसरात देवदर्शनासाठी लागलेल्या महिलांच्या रांगेतून प्रवेश करण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रभारी राहुरी तालुका होमगार्ड समादेशक अरिफ इनामदार यांच्यासह पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राहुरी शहरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फिर्यादी निखील राजू नारद (वय २४) यांच्या तक्रारीनुसार, ३० जुलै रोजी सायंकाळी बुवासिद्ध बाबा मंदिरात आरतीसाठी गेले असता महिलांची रांग सुरू होती. त्यावेळी आरोपी महिलांच्या रांगेतून जात असल्याने त्यांना अडविल्यानंतर किरकोळ वाद झाला. त्याच रात्री सुमारे १०.३० वाजता मंदिराकडे जात असताना आरोपींनी त्यांना अडवून जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात शाहरुख फारुख शेख, अरिफ आयुब इनामदार, मुसा चौध शेख, मोहसिन उर्फ गोप्या अकबर शेख आणि शाहबाज उर्फ मुर्गी अन्सार सय्यद या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर करीत आहेत.
होमगार्ड समादेशक पदावरून कारवाई होणार?
या प्रकरणातील आरोपी अरिफ इनामदार हे प्रभारी राहुरी तालुका होमगार्ड समादेशक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने होमगार्ड विभाग व गृह विभाग याची दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय चौकशी व निलंबन अथवा इतर शिस्तभंगाची कारवाई करणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
घटना घडली त्यावेळी ते अधिकृत ड्युटीवर होते की नव्हते, तसेच ते गणवेशाऐवजी सिव्हिल ड्रेसमध्ये होते का, याबाबतही विविध चर्चा सुरू असून या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.
दुसऱ्या शासकीय विभागातही कार्यरत असल्याची चर्चा
अरिफ इनामदार हे राहुरी पंचायत समितीअंतर्गत पशुसंवर्धन विभागात शिपाई म्हणूनही कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर संबंधित विभाग कोणती प्रशासकीय भूमिका घेतो, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.
