इलेक्ट्रिक शवदाहिनी, सभामंडप व सुरक्षा रक्षकाच्या मागणीसाठी जळगाव महापालिकेसमोर नागरिकांचा १६ ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा.
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी तब्बल ४५५ दिवसांपासून पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. “झोपलेल्या प्रशासनाला जागे करा” या घोषवाक्यासह १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहर महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

नागरिकांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांना दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी, सभामंडप, सुरक्षा रक्षक तसेच अन्य अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. याबाबत पूर्वी अर्ज, स्मरणपत्रे आणि प्रशासनाकडून आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात कोणतीही कामे झालेली नाहीत.
निवेदनानुसार, प्रशासनाने यापूर्वी कामे हाती घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, आश्वासनानंतरही अनेक महिने उलटून गेले तरी परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुख्य मागण्या
मेहरूण स्मशानभूमीत तातडीने इलेक्ट्रिक शवदाहिनी बसविण्यात यावी.
सभामंडपाचे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी उपलब्ध करावे.
सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करून परिसरातील अतिक्रमण व गैरप्रकारांना आळा घालावा.
आंदोलनाचे नेतृत्व गणेश पाटील, संदीप मांडोळे यांच्यासह परिसरातील नागरिक करणार असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
