जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगांव जिल्ह्यातील पाळधी–तरसोद बायपास परिसरात अलीकडील पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर बाब समोर आली. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही.

प्राथमिक पाहणीत रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असून, यापूर्वीही या कामाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

येत्या काही दिवसांत केंद्र सरकारच्या तांत्रिक पथकाकडून संपूर्ण रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून, या अहवालाच्या आधारे दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्याकडे सादर करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

यावेळी नशिराबाद परिसरातील नागरिकांनीही महामार्गालगतच्या विविध समस्या मांडल्या. पावसामुळे पाणी साचत असल्याने ड्रेनेज व्यवस्था तातडीने पूर्ण करून पाण्याचा योग्य निचरा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. तसेच परिसरातील बंद असलेले स्ट्रीट लाईट त्वरित सुरू करून नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

विकासकामांचा दर्जा, पारदर्शकता आणि नागरिकांची सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!