शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांचे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तीव्र निवेदन
जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
जळगाव – जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा दाव्यांच्या प्रलंबित प्रकरणामुळे शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेचे संदीप पाटील यांनी आज (३१ जुलै) पीक विमा संरक्षण कालावधी संपल्याची बाब निदर्शनास आणून दिली आणि विमा कंपन्या, जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून दावे निकाली काढण्याची मागणी केली.

पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांनी विमा दावे दाखल केले आहेत. काही शेतकऱ्यांना ४३ हजार, काहींना ४० हजार तर काहींना ८ हजार ५०० रुपये इतके नुकसान झाल्याचे त्यांनी उदाहरणे दिली. मात्र विमा कंपन्यांकडून योग्य पद्धतीने सर्वेक्षण न झाल्याने आणि दावे वेळेवर निकाली न निघाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
“३१ जुलैला संरक्षण कालावधी संपला. आजही अनेक गावांमध्ये सर्वेक्षण झालेले नाही. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी, महिला शक्ती संघटनांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने लक्ष घालावे,” असे पाटील यांनी म्हटले. त्यांनी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच पालकमंत्र्यांकडेही तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
पाटील यांनी स्पष्ट केले की, “लोकप्रतिनिधी व अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्यांनी फक्त शोपीस न करता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यावे. पालकमंत्र्यांनीही या विषयाची दखल घ्यावी. अन्यथा शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल.”
शेतकरी संघटनेने या प्रकरणात विमा कंपन्यांना, जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी संघटना पाठपुरावा करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
