जळगाव जिल्हा प्रतिनिधी, रावेर, महेश माळी.
जमिनीच्या जुन्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा लाकडी काठीने जबर मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना गारखेडा येथे उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता, मात्र रावेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास करत अवघ्या काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नाल्याजवळ आढळला होता संशयास्पद मृतदेह
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६ वर्षे) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३५८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला.
जमिनीचा वाद ठरला कारणीभूत
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक माहिती, भौतिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान समोर आले की, मयत रामा बारेला आणि त्यांचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९ वर्षे, रा. गारखेडा) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून सतत वाद सुरू होते. २१ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता याच वादाच्या रागातून आरोपी अनिल याने घराजवळ लाकडी काठीने काकांच्या डोक्यावर जोरदार वार केला, ज्यात रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.
असा रचला होता अपघाताचा बनाव
आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने काकाचा मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेला. त्याने हा मृतदेह पायवाटेजवळील एका नाल्याच्या कडेला टाकून दिला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू वाटेल. परंतु, पोलिसांनी बारकाईने तपास करत हा खुनाचा कट उघडकीस आणला. २२ जुलै रोजी रात्री आरोपी अनिल बारेला याला अटक करण्यात आली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.
पोलीस पथकाचे कौतुक
सदरची उल्लेखनीय कामगिरी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील व त्यांच्या पथकाने उत्कृष्ट समन्वयाने पार पाडली.
