जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.

जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ आणि शासकीय कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी दोन महिला पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी २१ जुलै रोजी जारी केले.

माहितीनुसार, १६ जुलै रोजी दुपारी पोलीस मुख्यालयातील हजेरी कक्षात आलेल्या दोन महिला अंमलदारांनी हजेरी प्रमुख संभाजी पाटील यांना वेतनवाढीबाबत वरिष्ठांकडे अहवाल का पाठवला, असा जाब विचारत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशीही आक्रमक वर्तन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याच घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, १७ जुलै रोजी आणखी एका महिला अंमलदाराने हजेरी कक्षात येऊन गोपनीय अहवाल वरिष्ठांकडे का पाठवला, याचा जाब विचारला. संबंधित अहवाल राखीव पोलीस निरीक्षकांनी पाठविल्याचे सांगितल्या नंतर त्यांनी हजेरी कक्षात उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केली. तसेच हजेरी प्रमुख, राखीव पोलीस निरीक्षक आणि अन्य एका कर्मचाऱ्याला चपलेने मारण्याची व न्यायालयात खटला दाखल करून नोकरी करू देणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन्ही महिला अंमलदारांना तात्काळ निलंबित केले. निलंबन कालावधीत त्यांना दररोज सकाळी व संध्याकाळी राखीव पोलीस निरीक्षकांकडे हजेरी लावणे बंधनकारक राहील. तसेच अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालयाची हद्द सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!