जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील
सातवाहनकालीन लेण्या, गवळी वाडा, सप्ततलाव आणि निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटन विकासाची मोठी संधी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगाव येथील ऐतिहासिक किल्ला, अर्थात गवळी राजांचा किल्ला, हा इतिहास, पुरातत्त्व, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा अनमोल ठेवा आहे. बाराव्या शतकात भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी गवळी राजांच्या काळात या किल्ल्याची उभारणी झाल्याचे सांगितले जाते. सन १८१८ आणि १८८० च्या ब्रिटिशकालीन गॅझेटिअरमध्येही या किल्ल्याचा उल्लेख आढळतो.

किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे आढळणाऱ्या सातवाहनकालीन सुमारे दोन हजार वर्षे जुन्या लेण्या. किल्ल्यावर दोन प्रवेशद्वारे, तटबंदी, बुरुज, भुयारी मार्ग तसेच सुमारे दहा गुंठ्यांत बांधलेला ऐतिहासिक गवळी वाडा आजही अस्तित्वात आहे. परिसरातील सप्ततलावांपैकी चार तलाव विविध दुर्गसंवर्धन संस्थांच्या प्रयत्नातून स्वच्छ करण्यात आले असून, येथे बारमाही पाणी आणि सुंदर कमळे पाहायला मिळतात.
किल्ल्याच्या पायथ्याशी समाधीस्थळे, वीरगळ आणि हेमाडपंथी मंदिराचे अवशेषही आढळले आहेत. सन १९७८ मध्ये येथे सुमारे सहा फूट लांबीच्या तोफा सापडल्याची माहिती असून, त्या सुरक्षिततेच्या कारणास्तव चोपडा तहसील कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत.

इतिहास संशोधक आणि स्थानिक अभ्यासकांनी सातवाहनकालीन लेण्या तसेच प्राचीन अवशेषांचा अभ्यास करून याबाबतचा अहवाल १४ मार्च २०२१ रोजी संबंधित पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळालेला नाही. वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या परवानगीच्या प्रश्नामुळे संवर्धनाचा विषय प्रलंबित असल्याचे सांगितले जाते.
चौगाव किल्ल्याच्या परिसरात त्रिवेणी महादेव मंदिर, भैरव घाट, राणी काजल समाधीस्थळ आणि आकर्षक धबधबा यांसारखी पर्यटनस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे किल्ल्याला तातडीने राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा तसेच राज्य पर्यटनाचा ‘ब’ दर्जा देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून परिसराचा विकास करावा, अशी मागणी इतिहासप्रेमी, दुर्गसंवर्धन संस्था आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

चौगाव किल्ल्याचा विकास झाल्यास खान्देशातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाला मोठी चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
