जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

अमर संस्था चोपडा संचलित प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी, बालमोहन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत शिक्षक दिन आणि दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर संस्थेचे हितचिंतक प्रा. डॉ. सुधीर चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून बालमोहन ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या प्रीती पाटील उपस्थित होत्या. बाळकृष्ण, सरस्वती आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

उपशिक्षिका वैशाली वसईकर यांनी विद्यार्थ्यांना गोपाळकृष्णाची आध्यात्मिक कथा सांगून दहीहंडी उत्सव कशासाठी साजरा केला जातो, याबाबत सविस्तर माहिती दिली. उपशिक्षिका सुनिता साठे यांनी शिक्षक दिनावर चर्चा करत आजच्या काळातील शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यावर गोष्टीरूपातून मार्गदर्शन केले. विद्यार्थी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत नटून सजून आले होते. बालगोपालांनी उंच मनोरा रचून दहीहंडी फोडली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर चौधरी म्हणाले, “आजचा विद्यार्थी नेहमी हसतमुख राहावा. तो उच्चपदस्थ व चांगला भारतीय नागरिक होऊन कुटुंब, समाज, शाळा आणि गावाचे नावलौकिक वाढवील. याकडे शिक्षक व समाजाने लक्ष दिले पाहिजे.”

अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी आणि सचिव दीपक जोशी यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या मुख्याध्यापिका रेखा नेवे, बालमोहन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्मिता बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन जगदीश धनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!