जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

अडावद (जळगाव): एका मानसिक असंतुलन असलेल्या महिलेच्या असहायतेचा निर्घृणपणे फायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने सामूहिक अत्याचार करण्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अडावद पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईमुळे दोन्ही आरोपींना घटनेच्या ४८ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे.

दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ०३:०० वाजेदरम्यान अडावद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील नाल्याच्या परिसरात ही घटना घडली. आरोपी जितेंद्र रामदास भोई आणि गणेश सुकदेव भोई (दोन्ही रा. धानोरा, ता. चोपडा) यांनी पीडित महिलेला एकटी असल्याचे पाहून तिला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून नाल्याकडे नेले आणि तिच्या मानसिक व शारीरिक असहायतेचा गैरफायदा घेत आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.

पीडित महिला घरी परतल्यानंतर घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर तिच्या पतीने तात्काळ अडावद पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पथक रवाना केले आणि दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींविरुद्ध CCTNS गु.र.नं. १४७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६३(५), ६४(k) आणि ७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः ए पी आय प्रशांत कंडारे यांच्याकडे सुरू आहे.

अडावद पोलीस ठाण्याने केलेल्या या वेगवान आणि कठोर कारवाईचे जिल्ह्यातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणांमध्ये ‘झीरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!