जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरुण : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक स्व. सुरेश मामा नाईक यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेच्या सभागृहाला “स्व. सुरेश मामा नाईक सभागृह” असे नामकरण करण्यात आले. शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा या संस्थापकांनी जपलेल्या मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. सुरेश मामा नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी “संस्थापकांचे स्वप्न – संस्कार, शिक्षण आणि समाजसेवा; हाच आमचा संकल्प.” ही प्रतिज्ञा घेत संस्थापकांच्या विचारांशी निष्ठा व्यक्त केली.

यावेळी “एक विद्यार्थी – एक कौशल्य” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान आणि शैक्षणिक साहित्य वाटप यांसारख्या उपक्रमांतून संस्थापकांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमात बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक म्हणाले, “स्व. सुरेश मामा नाईक यांनी शिक्षण हीच खरी समाजसेवा मानून या संस्थेची पायाभरणी केली. त्यांचे स्वप्न केवळ शाळा उभारण्याचे नव्हते, तर सुसंस्कारित, सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे होते. सभागृहाला त्यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी संस्थापकांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण कृतज्ञता, आदर आणि प्रेरणेच्या भावनेने भारावून गेले होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!