जळगाव प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील रामेश्वर कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व तरुणी वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात यावे, अशी विनंती जळगाव महानगर पालिका स्थानिकांनी आयुक्त यांना निवेदनाद्वारे केलेली आहे.

सध्याच्या परिस्थितीत मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज बनली आहे. या प्रशिक्षणामध्ये कराटे, सेल्फ डिफेन्सची तंत्रे, आपत्कालीन प्रसंगी स्वतःचे संरक्षण, महिलांचे कायदेशीर हक्क तसेच महिला सुरक्षा विषयक मार्गदर्शनाचा समावेश करण्यात यावा.

तसेच, केवळ एकदाच प्रशिक्षण शिबिर आयोजित न करता रामेश्वर कॉलनी परिसरात मुलींसाठी कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, जेणेकरून परिसरातील मुली व विद्यार्थिनी नियमितपणे प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने व सुरक्षितपणे जीवन जगू शकतील.

तरी आपण या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन वार्ड क्रमांक १९, रामेश्वर कॉलनी परिसरात लवकरात लवकर मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे तसेच कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. आपल्या सकारात्मक निर्णयामुळे परिसरातील मुलींची सुरक्षितता, आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाला निश्चितच चालना मिळेल, असे निवेदनांत नमूद करण्यात आलेले आहे. निवेदन देताना हर्षल वाणी, संदीप मांडोळे, गणेश पाटील, अविनाश पाटील, आणि इतर ही स्थानिक उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!