चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

भारत निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी शहरातील सर्व मतदारांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून मतदार यादीतील माहिती अचूक व अद्ययावत ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक पात्र मतदाराने SIR फॉर्म तातडीने भरून आवश्यक कागदपत्रांसह आपली माहिती अद्ययावत करावी. या प्रक्रियेसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र (Voter ID), चालू मोबाईल क्रमांक आणि दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो तयार ठेवावेत. SIR फॉर्मवर फोटो लावला जाणार असल्याने नागरिकांनी पासपोर्ट साईज फोटो आधीच काढून ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तसेच, प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांसह शेजारी, नातेवाईक आणि परिसरातील सर्व पात्र मतदारांपर्यंत ही माहिती पोहोचवून जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, मतदार यादी अद्ययावत ठेवल्यास भविष्यातील निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

महत्त्वाचे मुद्दे :

प्रत्येक पात्र मतदाराने SIR फॉर्म भरावा.

आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, चालू मोबाईल क्रमांक व दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटो.

मतदार यादीतील माहिती अचूक व अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी.

कुटुंबातील व परिसरातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत ही माहिती पोहोचवावी.

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

“आपले मत, आपला अधिकार… मतदार यादी अद्ययावत ठेवा आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी सक्रिय सहभाग नोंदवा,” असे आवाहन चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!