जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. :

जुलै महीना अर्धा उलटला असून देखील राज्यात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सुरुवातीला पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली खरी मात्र, पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यात आता आठवड्याभरापासून पावसाने उसंत घेतली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही परिस्थिती येत्या चार ते पाच दिवसांपर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही. मात्र, सध्या तरी मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यात सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. एकीकडे पावसाने उसंत घेतली आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत येवून ठेपला आहे. जळगावात तर तापमान वाढीमुळे उन्हाचा कडाका जाणवत आहे.

४-५ दिवस पावसाची शक्यता कमी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या ४-५ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता नाही. मात्र पुण्याचे घाटमाथे रायगड, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर,संभाजीनगर जालना या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय.

पुढच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल

जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. मात्र, खान्देशात तुरळक स्वरुपाचा पाऊस होता. त्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबारसह इतर जिल्ह्यांना समाधानकारक पावसाची प्रतिक्षा कायम आहे. तर येत्या ४-५ दिवसात तुरळक आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस काही ठिकाणी असेल. मात्र, २१ ते २२ जुलै नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!