चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
चोपडा शहरातील मोमीन गल्ली परिसरात संशयित गोमांसाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून सुमारे १५ ते २० किलो संशयित मांस जप्त केले. या प्रकरणी २१ वर्षीय युवकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक पवन देसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचांच्या उपस्थितीत मोमीन गल्ली परिसरात छापेमारी करण्यात आली. कारवाईदरम्यान अकमल जावीद कुरेशी (वय २१, रा. मोमीन गल्ली, चोपडा) हा आपल्या घरासमोर संशयित मांसाची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.
छाप्यात आरोपीच्या ताब्यातून सुमारे १५ ते २० किलो वजनाचे संशयित मांस जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासणीत हे मांस गोवंशाचे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने पशुधन विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. अधिकाऱ्यांनी मांसाची प्राथमिक तपासणी करून त्याचे नमुने पुढील वैज्ञानिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले, तर उर्वरित मांसाचा पंचनामा करून नियमानुसार नाश करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी चंदन विष्णू पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ मधील कलम ५(क) व ९(अ) अन्वये चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून जप्त नमुन्यांच्या प्रयोगशाळा अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर मांसविक्रीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.
