चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत चोपडा बसस्थानक परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” हा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास एस.टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस.टी. महामंडळाने राज्यभरातील बसस्थानके, आगार आणि विभागीय कार्यालयांच्या परिसरात सुमारे ९ हजार ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला असून, हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर “हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे” असा संदेश देण्यात आला असून, संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या ओळींद्वारे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संवर्धन हीदेखील प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यास आणि हरित भविष्य घडविण्यास निश्चितच हातभार लावणारा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!