मेहरुण, जळगांव प्रतिनिधी, महेश माळी :

मेहरुण येथील रामेश्वर कॉलनीमार्गे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील नागरिक, रिक्षाचालक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून, विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर परिसरातील रिक्षाचालकांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच पुढाकार घेतला. आज सर्व रिक्षाचालकांनी एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातून मुरूम व खडी टाकत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. त्यांच्या या उपक्रमामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, रिक्षाचालकांना आणि विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला.

रामेश्वर कॉलनी परिसरातील हा रस्ता स्मशानभूमीकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असून, दररोज शेकडो नागरिक, रिक्षा, दुचाकीस्वार तसेच शाळकरी विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. रस्त्याची खराब अवस्था पाहता वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताचाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते.

या श्रमदान उपक्रमात संजय पाटील, महेश शिंपी, अनिल निळे, योगेश वाणी, नाजीम शेख, विनोद पाटील, अजय आणि श्रीकांत लोहार यांनी सक्रिय सहभाग घेत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी मनापासून कौतुक केले.

दरम्यान, या रस्त्याची केवळ तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी दुरुस्ती करून दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. रिक्षाचालकांच्या या सामाजिक पुढाकारामुळे लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून, प्रशासनाने आता तरी या रस्त्याची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!