“इतिवृत्त वाचल्याशिवाय सभा कशी संपवली?” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारीचा इशारा

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

चोपडा नगरपालिकेची तब्बल १०० दिवसांनंतर झालेली सर्वसाधारण सभा बुधवारी मोठ्या वादात सापडली. सभेच्या कामकाजात मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी न घेता सभा संपविण्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाचे गटनेते गजेंद्र जैसवाल यांनी करत सत्ताधारी पक्ष व प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.

सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गजेंद्र जैसवाल म्हणाले की, शासनाच्या नियमानुसार प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून त्यास सभागृहाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र या मूलभूत प्रक्रियेलाच बगल देत काही मिनिटांत सभा संपविण्यात आली. हा प्रकार लोकशाही परंपरेला आणि नगरपरिषद कायद्यालाच हरताळ फासणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.

जैसवाल यांनी सांगितले की, विरोधी सदस्यांनी इतिवृत्त वाचनाची मागणी केली असतानाही ती नाकारण्यात आली. त्यानंतर अचानक सभा समाप्त घोषित करण्यात आल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास विभाग आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी या घटनेला संविधानिक मूल्यांचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याचे म्हटले. नगरसेविका सौ. संध्या महाजन यांनी काही गंभीर बाबी दडपण्यासाठीच सभा घाईघाईने संपविण्यात आल्याचा आरोप केला.

ज्येष्ठ नगरसेवक भूपेंद्र गुजराथी यांनी, “गेल्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारची हुकूमशाही पद्धत प्रथमच पाहायला मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. रोहन पाटील यांनीही जनहिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

या संपूर्ण प्रकरणामुळे चोपडा नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधी पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासन व सत्ताधारी पक्ष यावर काय भूमिका घेतात, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार परिषदेला गटनेते गजेंद्र जैसवाल, नरेंद्र पाटील, भूपेंद्र गुजराथी, सौ. संध्या महाजन, सौ. पूजा देशमुख, शकिलाबी बागवान, डॉ. रोहन पाटील, शरद पाटील, तिलकचंद शहा यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!