चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
महावितरणच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप; धोकादायक पोल आठ दिवसांत हटविण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन
चोपडा शहरातील गुरुकुल नगर परिसरात लोखंडी विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या कथित निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. धोकादायक ठरत असलेल्या विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुकुल नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याच्या मधोमध उभारलेल्या लोखंडी विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. याच दरम्यान परिसरातील रहिवासी सुनील नामदेव पाटील (उर्फ गॅरेजवाले मामा) यांच्या मालकीची गाय त्या पोलच्या संपर्कात आली. जोरदार विद्युत धक्का बसल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. गाईच्या मृत्यूमुळे मालक सुनील पाटील व त्यांच्या पत्नींना मोठा मानसिक धक्का बसला असून त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचेही मन हेलावून गेले.
संतप्त नागरिकांनी या दुर्घटनेसाठी महावितरणच्या कथित निष्काळजीपणाला जबाबदार धरत संबंधित भागातील विद्युत यंत्रणेची नियमित देखभाल होत नसल्याचा आरोप केला. धोकादायक अवस्थेतील लोखंडी पोल तातडीने हटविण्याची तसेच संपूर्ण परिसरातील विद्युत पोल, तारा आणि इतर यंत्रणांची सखोल तपासणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणचे अधिकारी तुषार कापगते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, दुर्घटनेनंतर सुमारे तीन तासांनी अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी मृत गाईचा पंचनामा करून नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी संबंधित धोकादायक लोखंडी विद्युत पोल येत्या आठ दिवसांच्या आत हटवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले. तसेच घटनेबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेनंतर गुरुकुल नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने संपूर्ण शहरातील धोकादायक विद्युत पोल, तारा व यंत्रणांची तातडीने तपासणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
