संपादकीय
महाराष्ट्रातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शेतीसमोरील वाढत्या आर्थिक आव्हानांमुळे हा कणा अनेकदा कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, महापूर, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारातील अनिश्चितता या सर्वांचा परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतो. एकदा कर्ज थकल्यानंतर नव्याने कर्ज मिळणे कठीण होते आणि आर्थिक अडचणींचे दुष्टचक्र सुरू राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ तात्पुरता दिलासा नव्हे, तर कायमस्वरूपी उभारी देणाऱ्या धोरणांची आवश्यकता होती.

याच व्यापक पार्श्वभूमीवर राज्य शासनाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026” जाहीर केली आहे. ही योजना केवळ 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा म्हणून पाहणे म्हणजे तिच्या मूळ उद्देशाचे अवमूल्यन ठरेल. प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीसह कृषी व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा घडवून आणण्याच्या व्यापक विचारातून साकार झाली आहे.
विशेष म्हणजे हा निर्णय भावनिक किंवा राजकीय पातळीवर न घेता अभ्यासपूर्ण प्रक्रियेतून पुढे आला आहे. तज्ज्ञांच्या उच्चाधिकार समितीने राज्यातील कर्जबाजारीपणाच्या कारणांचा सखोल अभ्यास करून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या. त्याच शिफारशींच्या आधारे शासनाने तातडीचा दिलासा आणि भविष्यातील शाश्वत सुधारणा यांचा समन्वय साधणारी भूमिका स्वीकारली आहे. ही बाब या निर्णयाला अधिक विश्वासार्ह बनवते.
या योजनेतील सर्वाधिक सकारात्मक बाब म्हणजे कर्जमाफीबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणालाही सन्मान देण्यात आला आहे. अनेकदा कर्जमाफीच्या योजनांमध्ये नियमित कर्जफेड करणारे शेतकरी दुर्लक्षित राहतात. यावेळी मात्र शासनाने वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ जाहीर करून आर्थिक शिस्तीला प्रतिष्ठा दिली आहे. त्यामुळे “प्रामाणिकपणाला बक्षीस आणि संकटग्रस्तांना आधार” असा संतुलित संदेश या योजनेतून दिला गेला आहे.
तसेच, 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (OTS) ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी मार्च 2027 पर्यंत मुदत दिल्याने अनेक शेतकऱ्यांना पुन्हा बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय शेतकरी आणि बँक या दोघांच्याही हिताचा आहे. या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे डिजिटल पारदर्शकता. आधार प्रमाणीकरण, अॅग्रीस्टॅक नोंदणी, ऑनलाइन प्रक्रिया आणि “सहकार स्टॅक”ची उभारणी यामुळे कृषी कर्ज व्यवस्थापन अधिक विश्वासार्ह, गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. भविष्यातील कृषी धोरणांसाठी ही डिजिटल पायाभरणी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
योजनेची अंमलबजावणी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. यामुळे आवश्यकतेनुसार धोरणात्मक बदल, सातत्यपूर्ण आढावा आणि प्रभावी अंमलबजावणीची संधी उपलब्ध होईल.अर्थात, कोणतीही योजना तिच्या घोषणेमुळे नव्हे, तर प्रभावी अंमलबजावणीमुळे यशस्वी ठरते. पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत वेळेत पोहोचणे, ऑनलाइन प्रणाली सुरळीत कार्यरत राहणे आणि बँकांचा सक्रिय सहभाग मिळणे, या बाबी तितक्याच महत्त्वाच्या असल्याने शासन याकडे प्राधान्याने लक्ष देत आहे.
आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तात्पुरत्या मदतीसोबतच आत्मविश्वास, आर्थिक स्थैर्य आणि भविष्यातील सुरक्षिततेची गरज आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026” ही त्या दिशेने टाकलेली एक महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि दूरदृष्टीची वाटचाल आहे. ही योजना केवळ कर्जमाफीची नाही, तर शेतकऱ्यांच्या सन्मानाची, आर्थिक शिस्तीची आणि शाश्वत कृषी विकासाची नवी दिशा ठरू शकते.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.
