जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

भुसावळ शहरातील बालाजी मंदिर परिसराजवळ काल रात्री जुन्या रेल्वे व्यवसायाच्या वादातून एका तरुणावर पिस्तूलमधून दोन राऊंड फायर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला असून, याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडित (वय ३०, रा. राहुल नगर, बालाजी मंदिर जवळ, भुसावळ) हे भुसावळ नगरपालिकेत नोकरीस हे आहेत. दिनांक ६ जुलै २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास गोलू पंडित हे त्यांच्या घराजवळील ‘वैभवी ट्रेडर्स’ दुकानाच्या ओट्यावर मोबाईलवर बोलत बसले होते, तर त्यांचा मित्र रोहित विजू सपकाळे हा जवळच असलेल्या रिक्षात बसला होता.

त्याच वेळी सातारा दगडी पुलाकडून मोटारसायकलवर दोन जण आले. गोलू पंडित यांनी दिलेल्या जबाबानुसार, मोटारसायकल चालवणाऱ्या अमोल विनोद देवरे (रा. रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ) आणि मागे बसलेल्या अनिकेत उर्फ कालु मनोज जाधव (रा. वाल्मीक नगर, भुसावळ) यांनी त्यांच्या दिशेने गाडी आणली. गाडी मागे बसलेल्या अनिकेत उर्फ कालु याने गोलू पंडित यांच्या दिशेने पिस्तूलमधून पहिली गोळी झाडली. गोलू पंडित यांनी प्रसंगावधान राखून बाजूला धाव घेतल्याने गोळी जमिनीवर लागली व ते बालंबाल बचावले.

त्यानंतर काही अंतरावर मोटारसायकल थांबवून संशयितांनी, “तू रेल्वेच्या बिझनेसमध्ये लक्ष देऊ नको, नाहीतर तुला जिवंत मारून टाकू,” अशी धमकी दिली आणि शिवीगाळ केली. यानंतर अनिकेत याने गोलू पंडित यांच्यावर निशाना धरून दुसरा राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे (मिसफायर) दुसरी गोळी सुटली नाही. यानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. घाबरलेल्या अवस्थेत गोलू पंडित आणि त्यांच्या मित्राने घर गाठून कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. आज, ७ जुलै रोजी गोलू पंडित यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशन गाठून अधिकृत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अमोल विनोद देवरे आणि अनिकेत उर्फ कालु मनोज जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भुसावळ शहर पोलीस करत आहे.

 

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!