🚨 ब्रेकिंग न्यूज
चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील.
हवामान विभागाने चोपडा परिसरासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानंतर चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांनी शहरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, पाणी साचलेल्या रस्ते, नाले व पूरप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन केले.
पावसाळ्यात वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे, निसरड्या रस्त्यांवर विशेष काळजी घ्यावी तसेच वीजेचे खांब, उघड्या तारा, ट्रान्सफॉर्मर किंवा पाण्यात बुडालेल्या विद्युत उपकरणांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचना व हवामान विभागाच्या इशाऱ्यांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही त्यांनी नमूद केले.
“आपली एक छोटीशी खबरदारी मोठी दुर्घटना टाळू शकते. सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा,” असे आवाहन नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांनी केले आहे.
