जळगाव (चोपडा) प्रतिनिधी, यद्नेश्वर पाटील.

बुऱ्हानपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली असून, लवकरच या विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नियोजनासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली. बैठकीत शहरांतील वाहतुकीच्या समस्या, नागरिकांच्या मागण्या आणि भविष्यातील विकासाचा सखोल आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामाला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. वाढती वाहतूक आणि शहरांतील गर्दी लक्षात घेऊन रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना वळसा घालणारे बायपास मार्ग विकसित करण्यात येत आहेत.

मात्र, या बायपासमुळे शहरांतील विद्यमान मुख्य रस्त्यांच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्र शासन आणि NHAI कडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे.

या प्रकल्पामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांतील अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच व्यापारी व्यवहारांना चालना, दळणवळण व्यवस्थेत सुधारणा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याने हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

रस्ते विकास, सुरक्षित वाहतूक आणि शहरांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी ही एक मोठी विकासभेट मानली जात आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!