जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच कृतीतून, अनुभवातून आणि खेळाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सोपे शिक्षण तास’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अक्षर व अंक ओळख, वाचन-लेखन, गणितीय संकल्पना, चित्रकला, हस्तकला, कृतीगीते, गोष्टी, बौद्धिक खेळ, निसर्ग निरीक्षण तसेच जीवनोपयोगी सवयी यांचे शिक्षण विविध कृतींच्या माध्यमातून दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्यातील सहभाग वाढत असून त्यांच्या निरीक्षणशक्ती, विचारक्षमता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाला चालना मिळत आहे.
उपक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र ‘3-इन-1 वही’ देण्यात आली असून त्यामध्ये दररोजच्या कृती, सराव आणि शैक्षणिक उपक्रमांची नोंद केली जात आहे. खेळत-खेळत शिकण्याच्या या पद्धतीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वर्गातील वातावरण अधिक आनंददायी झाले आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळा सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेला ‘सोपे शिक्षण तास’ हा उपक्रम पालक आणि शिक्षणप्रेमींकडूनही कौतुकास पात्र ठरत आहे.
