जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांसाठी “स्माईल योग” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना योगाची ओळख आनंददायी, खेळकर व सहज पद्धतीने व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमात विद्यार्थ्यांनी हास्ययोग, श्वसनक्रिया तसेच फुलपाखरू आसन, वृक्षासन, सर्पासन यांसारखी विविध सोपी योगासने उत्साहाने सादर केली. विविध कृती, खेळ आणि सामूहिक हास्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योगाचा आनंद घेतला. “हसा आणि निरोगी रहा” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहण्यास, मन प्रसन्न राहण्यास तसेच सकारात्मक जीवनशैली विकसित होण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा व आनंदी राहण्याचा संकल्प केला.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
