जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगावच्या मुक्ताईनगर – जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘कोंबिंग ऑपरेशन’ अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये गुरुवारी पहाटे मोठी कारवाई करत गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक, खंडणी, लूटमार व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरोधात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

पोलीस तपासानुसार लालमाटी, हलखेडा, मधापुरी, जोंधणखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये काही वर्षांपासून विविध प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याची माहिती समोर आली होती. सोशल मीडियावर बनावट ओळखी तयार करून नागरिकांना आमिष दाखवणे, त्यांना गावात बोलावून लूटमार करणे, खंडणी उकळणे तसेच महिलांच्या नावाने संपर्क साधून व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी जाहीर केलेल्या lआकडेवारीनुसार मागील तीन वर्षांत या परिसरात १० दरोडे, १ घरफोडी-दरोडा, २ खून, ७ जबरी चोरी, १६ फसवणूक, २ दरोड्याचे प्रयत्न आणि २ सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

या विशेष कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे २० लाख रुपये रोख रक्कम, ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ३० लाख रुपये), ४ किलो चांदीचे दागिने (किंमत अंदाजे ८ लाख रुपये), दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, हरणाचे व सशाचे कातडे, एक चारचाकी वाहन, सहा दुचाकी वाहने तसेच ३० मोबाईल फोन जप्त केले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० पोलिसांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पहाटेच्या सर्च ऑपरेशनदरम्यान अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून काहींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा, मुक्ताईनगर पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलिसांच्या विविध पथकांचा सहभाग होता. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळण्याचे, कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
