जळगाव शहर प्रतिनिधी महेश माळी.

पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची सोनपोत हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना आयोध्यानगर परिसरात घडली. या प्रकरणी एका संशयिताची ओळख पटली असून त्याच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोध्यानगर येथील रहिवासी मंगला शांताराम चौधरी (वय ७५) या १४ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी समोरून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवून एका पत्त्याची चौकशी केली. दुचाकी चालविणाऱ्या तरुणाने वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले. मंगला चौधरी या हाताच्या इशाऱ्याने संबंधित ठिकाण समजावून सांगत असतानाच मागे बसलेल्या साथीदाराने त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाची आणि दीड लाख रुपये किमतीची सोनपोत झडप घालून ओढली. घटना घडताच दोन्ही चोरटे दुचाकीवरून भरधाव वेगाने भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्याने पसार झाले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या वृद्धेने आरडाओरड केली. त्यानंतर त्यांचा मुलगा आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. मात्र, तोपर्यंत चोरटे नजरेआड झाले होते. घटनेनंतर मंगला चौधरी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांना काही संशयितांचे छायाचित्रे दाखविली. त्यातील एका व्यक्तीला त्यांनी ओळखले असून तोच दुचाकी चालवत असल्याचे सांगितले. त्यानुसार सादीक शेख इबाबत शेख इराणी (वय २३, रा. पापा नगर, भुसावळ) याच्यासह त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!