प्रतिनिधी, सुनील पवार.

जिल्ह्यासह विविध तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांत गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखू माफियांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक मोहीम उघडली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ठिकठिकाणी धाडी टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला जात असतानाच, परतूर तालुक्यात मात्र चित्र याउलट पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात कारवायांचा धडाका सुरू असताना परतूर तालुक्यात मात्र गुटखा माफियांची मुजोरी आणि दादागिरी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सगळीकडे कायद्याचा बडगा, मग परतूर पोलिसांचे अभय नेमके कोणाला? असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात धडक कारवाया, परतूरमध्ये ‘चैन’

गेल्या काही आठवड्यांत जालना जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवायांचे सत्र राबवले आहे. गुटखा तस्करीचे मोठे जाळे उद्धस्त करत पोलिसांनी गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहेत. परंतु, या मोहिमेची कोणतीही भीती परतूर तालुक्यातील गुटखा सम्राटांना लागलेली दिसत नाही. परतूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक गोदामांमध्ये आणि छुप्या अड्यांवर राजरोसपणे प्रतिबंधित गुटख्याची साठेबाजी आणि वाहतूक सुरू आहे.

माफियांची दादागिरी अन् ‘ते’ संशयास्पद मौन !

परतूर तालुक्यातील गुटखा माफियांची दादागिरी इतकी वाढली आहे की, त्यांच्या अवैध धंद्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणी करत नाही. शाळकरी मुले आणि तरुण पिढी या जीवघेण्या व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या मुख्य चौकांत आणि संवेदनशील भागात हा गुटखा सर्रास विकला जातो, तिथून हाकेच्या अंतरावर पोलीस प्रशासन असते. मात्र, तरीही या गुटखा सम्राटांवर कोणतीही ठोस कारवाई का होत नाही? हा परतूर पोलिसांचा केवळ ‘कानाडोळा’ आहे की यामागे काही

‘अर्थपूर्ण’ लागेबंधे आहेत, अशी जाहीर चर्चा आता चौकाचौकात रंगू लागली आहे.

तरुण पिढी बरबाद, प्रशासन सुस्त !

जिल्ह्यात एवढ्या मोठ्या कारवाया होत असताना परतूर पोलिसांना आपल्या हद्दीतील गुटख्याचे गोदाऊन दिसत नाहीत का? की पोलीस जाणीवपूर्वक या माफियांचे लाड पुरवत आहेत? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तात्काळ लक्ष घालून परतूरमधील या काळ्या धंद्याचा बिमोड करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. – कार्यकर्ते स्थानिक नागरिक व सामाजिक

वरिष्ठ पोलीस अधिकारी दखल घेणार का?

जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यात गुटखा मुक्तीसाठी कंबर कसली असताना, परतूर पोलिसांच्या या ढिसाळ आणि संशयास्पद भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेलाच हरताळ फासला जात आहे. आता गरज आहे ती वरिष्ठ पातळीवरून थेट परतूर तालुक्या ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबवण्याची.

गुटखा माफियांच्या मुसक्या आवळू परतूर पोलिसांच्या या संशयास्पद ‘अभया’च पडदाफाश कधी होणार? याकडे आता संपूर जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!