चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
चोपडा शहर पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध कारवाई करत त्याला अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा, मोबाईल व दुचाकीसह एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विलास सुरेश पारधी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक तरुण विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे दुचाकीवरून येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चुंचाळे गावाजवळ सापळा रचून संशयित वाहनचालकाला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान संशयित विनोद वसंतराव पावरा (वय २४, रा. अमलवाडी, ता. चोपडा) याच्या कमरेला ३० हजार रुपये किमतीचा स्टीलचा गावठी कट्टा आढळून आला. तसेच त्याच्या ताब्यातील १० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि ४५ हजार रुपये किमतीची होंडा लिओ दुचाकी (क्र. MH-19-CS-6198) जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
कारवाईनंतर घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विलास पारधी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज करीत आहेत.
