जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
जालना जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यरात्री जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी अंबड तालुक्यातील गोंदी परिसराला अचानक भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या या ‘सरप्राइज व्हिजिट’मुळे जिल्ह्यातील वाळूमाफिया आणि अवैध उत्खनन करणाऱ्या घटकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री थेट ‘ऑन द स्पॉट’ पाहणी
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री केलेल्या या अचानक पाहणीदरम्यान गोंदी परिसरातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भातील हालचालींचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या मोहिमेत महसूल, पोलीस, परिवहन (RTO) आणि इतर संबंधित विभागांकडून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या कारवायांची माहिती त्यांनी जाणून घेतली. अवैध खनिज उत्खनन पूर्णपणे रोखण्यासाठी विविध विभागांनी आपापसातील समन्वय अधिक प्रभावी करावा आणि संयुक्तरीत्या धडक कारवाया कराव्यात, अशा कडक सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
