जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील ममुराबाद रोड, चौघुले प्लॉट, रेल्वे पुलाजवळ परिसरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील गटारी तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी साचले असून कचरा उचलला जात नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार १५–१५ दिवस सफाई कर्मचारी परिसरात फिरकत नाहीत. रस्त्यावर नियमित झाडू मारला जात नसल्यामुळे घाण व डासांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गटारी साफ कराव्यात, कचरा उचलण्याची व्यवस्था करावी व नियमित साफसफाई सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
