जळगांव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील कानळदा हे जळगाव तालुक्यातील एक मोठे व प्रगत गाव असून येथे १७ सदस्यांची ग्रामपंचायत कार्यरत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील घरपट्टी, पाणीपट्टी आदी विविध करांमधून जमा होणारा ग्रामनिधी हा गावाच्या विकासासाठी वापरला जातो. यावर्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जमा झालेल्या निधीतून महिला व बालकल्याणासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला प्राप्त झाले.

या अनुषंगाने कानळदा ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक मा. श्री. पुंडलिक तुळशीराम सपकाळे यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करून अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स(आशा स्वयंसेवक) या २९ कर्तृत्ववान महिलांसाठी ग्रामपंचायत मार्फत भव्य व उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी या सर्व महिलांचे आगमन होताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर समारंभपूर्वक उच्च दर्जाच्या साड्या व पुष्पगुच्छ देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जळगाव महानगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेविका व कानळद्याची सुकन्या सौ. भारतीताई सागर सोनवणे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचाही उपस्थित महिलांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या आई-वडिलांचीही उपस्थिती हा सोहळ्याचा भावनिक क्षण ठरला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस बालवाडीतील विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे लसीकरण, कुपोषण निर्मूलन, गर्भवती महिलांच्या आहाराबाबत समुपदेशन अशी जबाबदारी पार पाडतात. आशा वर्कर्स ताई गर्भवती महिलांना मार्गदर्शन करून दवाखान्यात संस्थात्मक प्रसूती व्हावी यासाठी अथक प्रयत्न करतात. कोरोना सारख्या महामारीच्या कठीण काळातही या सर्व महिला फ्रंटलाईनवर ढालीसारख्या उभ्या राहून गावकऱ्यांना मार्गदर्शन करत होत्या. त्यांचे कार्य कधीही न विसरता येणारे आहे.
सरपंच मा. पुंडलिक सपकाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पोलीस उपअधिक्षक पदावर असताना प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि सेवानिवृत्तीनंतर सरपंच म्हणून प्रत्येक निधीचा योग्य विनियोग होऊन खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचावा, तसेच प्रत्येकाच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा यावर भर दिला आहे.
ते पुढे म्हणाले, “राजकारण पाच वर्षांचे असते, मात्र समाजकारण मरेपर्यंत असते.”
ग्रामस्तरावर काम करताना सत्तेत असताना विरोधकांकडून चांगल्या गोष्टींनाही विरोध केला जातो, त्यामुळे दरवर्षी या महिलांचा सन्मान करण्याचा मानस असूनही तो प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता.मात्र यावर्षी कोणत्याही विरोधाला न जुमानता कानळद्याच्या इतिहासात प्रथमच ग्रामनिधीतून या महिलांचा सन्मान करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला.
या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक श्री. रघुनाथ चव्हाण तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभले. ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण यांनीही ग्रामनिधी हा गावाचा निधी असून गावासाठी धाडसी व समर्पित काम करणाऱ्या या महिलांचा सन्मान करताना तो निधी सत्कारणी लागल्याचा मनस्वी आनंद व्यक्त केला.
सन्मानाला उत्तर देताना अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी सांगितले की, “आमच्या सेवाकाळात प्रथमच आमच्या कार्याची एवढ्या उत्कृष्ट पद्धतीने दखल घेतली गेली. उच्च दर्जाची साडी व सन्मान मिळणे हा आमच्यासाठी सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा आणि हृदयात कायम कोरला जाणारा क्षण आहे.”
या कार्यक्रमाला अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती अर्चना धामोरे मॅडम व श्रीमती मंगला सपकाळे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या भव्य आयोजनाने त्या भावूक झाल्या व त्यांनी कानळदा ग्रामपंचायतीच्या या कृतज्ञतेच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून साकारलेलाहा सोहळा आज गावात, तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.
कानळदा ग्रामपंचायतीने सिद्ध केले की योग्य निधीचा योग्य लाभार्थ्यांसाठी वापर आणि कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान हीच खरी समाजकारणाची दिशा आहे.
