जामनेरमध्ये दोन सख्ख्या भावांना अटक; चाकू हल्ल्यात किशोर बावस्करचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जामनेर : दुर्गादेवी मंडळाच्या पैशांच्या हिशेबावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट रक्तरंजित हत्येत झाल्याने जामनेर शहर हादरले आहे. सार्वजनिक उत्सवाच्या पैशांचा हिशेब मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात किशोर बावस्कर या तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या किशोरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी निलेश प्रभाकर नामटे आणि योगेश प्रभाकर नामटे या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर पुरा परिसरातील रहिवासी किशोर बावस्कर हा कन्हैय्या मित्र मंडळाचा सक्रिय सदस्य होता. शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास त्याने दुर्गादेवी मंडळाकडे जमा झालेल्या पैशांचा व खर्चाचा हिशेब विचारला. याच कारणावरून किशोरचा निलेश नामटे आणि योगेश नामटे यांच्याशी वाद झाला.
शाब्दिक वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. दोन्ही भावांनी किशोरला मारहाण केल्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला किशोर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. सुरुवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र किशोरचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरणात खुनाचे कलम लागू करण्यात आले. हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप आणि तणाव लक्षात घेता पोलिसांनी आरोपींना त्यांच्या घरापासून पोलीस ठाण्यापर्यंत पायी नेले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कुटुंबीयांकडून कठोर शिक्षेची मागणी
किशोरच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पैशांपेक्षा जीव अनमोल!
सार्वजनिक उत्सव आणि मंडळांच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आवश्यक असली, तरी हिशेबाच्या वादाचे रूपांतर हिंसाचारात होणे ही गंभीर सामाजिक समस्या आहे. पैशांचा वाद चर्चेतून आणि कायदेशीर मार्गाने सोडवता येतो; मात्र गेलेला मानवी जीव परत आणता येत नाही. त्यामुळे उत्सवांच्या काळात संयम, संवाद आणि कायद्याचा मार्ग स्वीकारणे हीच काळाची गरज आहे.
