सातपुड्याच्या कुशीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान; वीज, मोबाईल टॉवर आणि रस्त्याच्या सुविधांचा प्रश्न अद्याप कायम

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि तेराव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाणारे प्राचीन मनुदेवी मंदिर आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील या पुरातन मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभला असून, मंदिराचा जीर्णोद्धार ईश्वरसेन राजाच्या काळात झाल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे, सन १८८० मध्ये ब्रिटिशकालीन ‘खानदेश गॅझेटिअर’मध्येही मनुदेवी मंदिराचा उल्लेख आढळतो. शेकडो वर्षांचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या तीर्थक्षेत्राकडे मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळातही अपेक्षित त्या प्रमाणात शासनाचे लक्ष गेले नसल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे.

मंदिराला तीनही बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेले निसर्गरम्य वातावरण लाभले आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र मंदिर परिसरातील वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्कसाठी टॉवर आणि रस्त्यांची समस्या अद्याप कायम असल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ऐतिहासिक वारसा असूनही मूलभूत सुविधा अपुऱ्या का?

ब्रिटिश राजवटीत १८८० साली ज्या मंदिराची नोंद अधिकृत गॅझेटिअरमध्ये करण्यात आली, त्या मंदिराला स्वातंत्र्यानंतर तब्बल अनेक दशके उलटूनही मूलभूत सुविधा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असताना मनुदेवी मंदिराचा सर्वांगीण विकास कधी होणार? असा सवाल भाविक आणि परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शासनाने विशेष विकास आराखडा करावा

मनुदेवी मंदिर परिसराचा पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नियोजनबद्ध विकास करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा, नियमित वीजव्यवस्था, मोबाईल नेटवर्कची सुविधा, भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सोयी तसेच परिसराच्या सुरक्षिततेकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम असलेल्या मनुदेवी मंदिराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा भाविकांसह परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!