विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

१८ शाळांतील ६६ विद्यार्थ्यांचा सहभाग; तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मिळणार संधी

पाचोरा : विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाला चालना देण्यासाठी पाचोरा उर्दू केंद्राच्या वतीने ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद उर्दू शाळेतील मौलाना आझाद सभागृहात शुक्रवारी ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

पाचोरा उर्दू केंद्रातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळांमधील तब्बल ६६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले. विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे, अचूक शब्दलेखनाची सवय विकसित करणे आणि इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास वाढविणे हा स्पर्धेमागील प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम होते. स्पर्धेचे नियोजन व व्यवस्थापन रेहान खान, सय्यद फैजान, नगमा फातेमा आणि सना फिरदोस यांनी केले.

केंद्रस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. उर्दू विभागातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली तयारी आणि त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी कौतुक केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अल्ताफ हुसैन, मुख्याध्यापक एजाज बागवान, रईस सुबहान, अशफाक शेख, कदीर शेख, मोमीन अब्दुल मलिक, मोईन सय्यद, रुकय्या शेख, समीना शेख, उजमा फातेमा आणि माजिदा अंजुम यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेचे आकलन, शब्दलेखन कौशल्य आणि आत्मविश्वासाला चालना मिळाली असून पाचोरा उर्दू केंद्रातील शैक्षणिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!