अहिल्यानगर प्रतिनिधी, शंकर कवाने.
राहुरी तालुक्यातील आंबी शिवारातील गांधेवाडी परिसरातील ३३ वर्षीय मोलमजुरी करणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कुंडलिक वाघ हा विवाहित असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. सकाळच्या सुमारास त्याचा पुतण्या घरात गेल्यानंतर प्रदीप हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर पोलिस पाटील यांनी राहुरी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
मयत प्रदीप वाघ यांच्या पश्चात आई-वडील, दोन मुले, भाऊ, भावजय आणि पुतणे असा परिवार आहे. त्यांनी हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
